सोलापूर : गेल्यावर्षी गाळप केलेल्या उसाचे बिल थकवल्याने भिलारवाडी (ता. करमाळा) येथील मकाई सहकारी साखर कारखान्याच्या शेतकऱ्यांनी मंगळवारी करमाळा तहसील कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन केले. कारखान्याने थकीत ऊस बिले तत्काळ न दिल्यास तीव्र आंदोलन करू, असा इशारा ‘दत्तकला’चे संस्थापक, अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांनी दिला.
मकाई कारखान्याचे ऊस बिल जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आंदोलन चालूच राहणार असल्याचे प्रा. झोळ यांनी जाहीर केले.थकीत ऊस बिल मिळावे या मागणीसाठी संगोबा येथे निलजचे शेतकरी प्रा. राजेश गायकवाड यांनी उपोषण केले होते. त्यावेळी प्रशासन व कारखान्याने ३० नोव्हेंबरपूर्वी थकीत बिले देण्याचे आश्वासन दिले. लेखी आश्वासनानंतरही ऊस बिल न मिळाल्यामुळे प्रा. झोळ, शेतकरी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी संघर्ष समितीने बोंबाबोंब आंदोलन केले.
दरम्यान, आंदोलन सुरू असताना तरटगांव येथील हरिदास मोरे या शेतकऱ्याने अधिकाऱ्यांसमोर आपल्या अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे, एपीआय जगदाळे त्यांच्यासह सहकाऱ्यांनी मोरे यांना समजावून सांगत आत्मदहन करण्यापासून परावृत केले. या घटनेने आंदोलनस्थळी सर्वांची धावपळ उडाली. प्रभारी तहसीलदार विजयकुमार जाधव, प्रांतधिकारी ज्योती आंबेकर, नायब तहसीलदार गायकवाड यांसह दशरथ कांबळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रवींद्र गोडगे, अॅड. राहुल सावंत, शहाजी माने, सुदर्शन शेळके, हरीभाऊ झिंजाडे, विठ्ठलराव शिंदे. प्रा. राजेश गायकवाड, भगवान डोंबाळे आदी उपस्थित होते.