सोलापूर : साखर कारखान्यांनी १४ दिवसांच्या आत ऊस बिले न दिल्यास ती १५ टक्के व्याजासह देण्याचा आदेश साखर आयुक्तांनी काढला आहे. अखिल भारतीय किसान काँग्रेसचे राष्ट्रीय समन्वयक प्रकाश घाळे यांनी ही माहिती दिली. गेल्या दोन गळीत हंगामात कारखानदारांकडून शेतकऱ्यांची ऊस बिले थकविण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. त्यामुळे बिले मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना आंदोलनेही करावी लागली.
प्रकाश घाळे यांनी सांगितले की, सहकारी, खासगी कारखानदारांकडून ऊस बिले थकवण्याच्या समस्येमुळे देशभरातील शेतकरी त्रस्त झाले आहेत. कारखानदारांनी शेतकऱ्यांकडून ऊस घेतल्यानंतर १४ दिवसांच्या आत ऊस बिल अदा करणे, हे कायद्याने बंधनकारक आहे. कायदा अस्तित्वात असतानाही साखर कारखानदारांकडून याचे पालन होत नाही. ते शेतकऱ्यांची ऊस बिले थकवीत आहेत. घाळे म्हणाले , या गंभीर समस्येबाबत सरकारच्या स्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन शेतकऱ्यांना दिले होते. त्यानुसार सहकार मंत्र्याशी संपर्क साधून वारंवार निर्माण होणाऱ्या थकीत ऊस बिलांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधून घेतले आहे. कोणत्याही साखर कारखान्याने बिले थकवली तर शेतकऱ्यांनी आमच्याशी संपर्क साधावा, आम्ही पीडित शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ.