सोलापूर : दामाजी कारखान्यावर असलेल्या कर्जाचा आकडा मोठा आहे. कारखान्याकडे इतर कोणतेही प्रकल्प नाहीत, तरीही ऊस उत्पादकांना इतरांच्या बरोबरीने दर देण्याचा प्रयत्न करू, असा विश्वास अध्यक्ष शिवानंद पाटील यांनी दिला. तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी अध्यक्ष शिवानंद पाटील व संचालकांची भेट घेत अन्य कारखान्यांच्या बरोबरीने ३२०० रुपये दर द्यावा, अशी मागणी केली.
अध्यक्ष पाटील म्हणाले की, तालुक्यातील कारखानदारी अडचणीत असताना झालेल्या निवडणुकीत सभासदांनी आमच्यावर कारखाना चालवण्याची जबाबदारी सोपवली. कारखाना ताब्यात आला त्यावेळी जवळपास तीन लाख रुपये शिल्लक होते. त्या तेवढ्या रकमेवर कारखान्याचा गाळप हंगाम सुरू करताना ‘धनश्री’चे शिवाजीराव काळुंगे, राहुल शहा, रामकृष्ण नागणे, दामोदर देशमुख या प्रमुख मंडळींनी बँका व पतसंस्थांच्या माध्यमातून केलेल्या आर्थिक मदतीमुळे पहिला गळीत हंगाम ऊस उत्पादकांना प्रत्येक पंधरवड्याची बिले वेळेत अदा करत आम्ही यशस्वी केला.
पाटील म्हणाले, सध्या पाच लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट होते. मात्र, तीन लाखांपर्यंत गाळप करतानाही मोठा संघर्ष करावा लागेल. कामगार पगार, ऊस उत्पादकांची बिले आणि कारखान्याकडील ४० हजार सभासदांना २० रुपये किलोने साखर द्यावी लागणार असल्याने यंदाचा हंगामदेखील आर्थिकदृष्ट्या परवडणारा नाही, असेही ते म्हणाले. असे असले तरीही इतरांच्या बरोबरीने दर देण्याचा प्रयत्न करू, असे अध्यक्ष पाटील यांनी सांगितले.