कोल्हापूर : बुधवारी रात्री झालेल्या अवकाळी पावसाने जिल्ह्याच्या पूर्व भागात ऊस तोडणीत अडथळे निर्माण झाले. हातकणंगले, शिरोळ तालुक्यात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे नुकत्याच सुरू झालेल्या ऊस हंगामात पावसामुळे चिंता निर्माण झाली आहे. बहुतांश भागाला पावसाने झोडपून काढले आहे. त्यामुळे ऊस हंगामापुढे गाळपाच्या उद्दीष्टपूर्तीचा प्रश्न निर्माण झाला. आधी ऊस दराचे आंदोलन आणि आता पावसामुळे हंगामात व्यत्यय निर्माण झाला आहे.
यंदा पावसाने दडी मारल्याने उसाची म्हणावी अशी वाढही झाली नाही. दरासाठीच्या आंदोलनामुळे हंगाम लांबला. आंदोलन मागे घेण्यात आल्यानंतर हंगाम सुरळीत होईल, असे वाटत असतानाच दोन दिवसांच्या जोरदार पावसाने हंगामापुढे पुन्हा चिंता निर्माण केली आहे. पावसाने तोडीला आलेल्या उसाच्या शेतामध्ये पावसाचे पाणी साचून राहिले. गाळप हंगाम पूर्ण क्षमतेने सुरू झाला नाही.
मंगळवारी व बुधवारी झालेल्या पावसाने किमान आठवडाभर तरी ऊस तोडीचे गणित बसणार नाही, अशी स्थिती आहे. पावसाने ऊस तोडीचे वेळापत्रक विस्कटणार आहे. रस्त्यालगतचा ऊस तोडण्यावर भर द्यावा लागणार असला तरी उसाने भरलेली वाहने शेताबाहेर काढण्याची कसरतही शेतकऱ्यांना करावी लागणार आहे. आणखी काही दिवस पावसाचा अंदाज वर्तविण्यात आल्याने चिंता वाढली आहे.