सांगली : आमचा राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना सातत्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना राज्यात उच्चांकी दर देतो. मग स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खा. राजू शेट्टी यांचे सांगली जिल्ह्यात पहिले आंदोलन आमच्या कारखान्यावरच का? असा सवाल राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष विजयबापू पाटील यांनी केला. माजी खासदार राजू शेट्टी यांच्या आंदोलनास राजकीय झालर आहे, असा आरोपही त्यांनी केला.
उपाध्यक्ष विजयबापू पाटील म्हणाले की, कारखाना बंद पाडण्याचे आंदोलन ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान करणारे आहे. दुष्काळी स्थिती, त्यामुळे ऊस उत्पादनात झालेली घट, अवकाळी पाऊस यामुळे शेतकऱ्यांसमोर अडचणी आहेत. अशावेळी काटा बंद आंदोलन ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान करणारे आहे. आम्ही माजी खा. शेट्टी व त्यांच्या सहकाऱ्यांना आमची भूमिका समजावून सांगितली. तरीही त्यांनी आंदोलनाचा घेतलेला निर्णय चुकीचा आहे.
पाटील म्हणाले की, सांगली जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी रुपये ३१०० ची पहिली उचल देण्याचा निर्णय घेतला आहे. हा अंतिम दर नाही. प्रत्यक्ष साखर उताऱ्यावर एफआरपी निश्चित केली जाईल. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त पैसे देवू. यावेळी देवराज पाटील, कार्तिक पाटील, विठ्ठल पाटील, प्रदीपकुमार पाटील, कार्यकारी संचालक आर. डी. माहुली, संचालक व अधिकारी उपस्थित होते.