मिरज तालुक्यात अवकाळी पावसाने ऊस तोडण्या ठप्प

सांगली : गेले काही दिवस विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडत आहे. मिरज पश्चिम भागातील शेतीला अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. ऊस तोडणी बंद पडल्याने शेतकरी, कारखाने संकटात सापडले आहेत. तुंग, समडोळी, कवठेपिरान, दुधगाव, माळवाडी, सावळवाडी, कसबे डिग्रज, मौजे डिग्रजसह परिसरात पाऊस सुरू आहे.

सततच्या पावसामुळे ऊस तोडण्या ठप्प झाल्या आहेत. काही ठिकाणी तोडलेला ऊस फडातच अडकलेला आहे. वाहने शिवारात अडकली आहेत. त्यामुळे कारखानदारांना रस्त्याकडेच्या उसाची तोड करण्याशिवाय पर्याय राहिला नाही. शेतकरी पाऊस उघडण्याच्या प्रतीक्षेत आहेत. पाणी हटत नाही तोपर्यंत ऊस तोडणी बंद करण्यास ट्रॅक्टर चालकांना भाग पडले आहे.

ऊस शेतीसह पश्चिम भागातील द्राक्षे, फुले, वांगी, दोडका, मिरची, गवारी, भेंडी यांसह पालेभाज्यांच्या शेतीला अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. या भागातील रोपवाटिकांधून मिरज पश्चिम भागासह सांगली, कोल्हापूर व सातारा जिल्ह्यात रोपे विक्रीसाठी पाठवली जातात. काही ठिकाणी रोपे उघड्यावरच असल्याने लाखो रोपांचे नुकसान झाले. ऊस तोडणी मजुरांचे हाल होत आहेत. सरकारने अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आनंदराव नलावडे यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here