गंगापूर : गंगापूर सहकारी साखर कारखान्याकडे यंदा ६५०० हेक्टर ऊस नोंदणी झाली आहे. हंगामााठी आवश्यक यंत्रसामुग्री व ऊस तोडणी, वाहतूक यंत्रणा सज्ज आहे. कारखान्याने ३०० टन साखर उत्पादित करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, असे प्रतिपादन कारखान्याचे अध्यक्ष कृष्णा पाटील- डोणगावकर यांनी केले आहे. सभासद व ऊस पुरवठादारांनी सर्व ऊस कारखान्याकडे पाठवून सहकार्य करावे, असे आवाहन पाटील- डोणगावकर यांनी यावेळी केले.
अध्यक्ष पाटील- डोणगावकर म्हणाले की, कारखान्यात चिमणी, बॉयलरसह तीस कोटींची मशीनरी बसवण्यात आली आहे. कारखान्याचे व्यवस्थापक अविनाश शिंदे यांच्या मार्गदर्शनात येथील कामगार अहोरात्र काम करत कारखान्यात येणार्या समस्या सोडविण्यात व्यस्त आहेत. पंधरा वर्षांनंतर कारखान्याची चाके फिरत असून सभासद शेतकरी खुश झाले आहेत. कारखान्याने या गळीत हंगामात सुरुवातीला दोन हजार मेट्रिक टन उसाचे गाळप आणि तीन मेगावॅट वीज निर्मितीचे उद्दिष्ट ठेवले आहे असे अध्यक्ष डोणगावकर यांनी सांगितले. पुढील पाच दिवसात कारखाना सुरू होणार आहे.