धाराशिव : ढोकी येथील तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या कथित साखर घोटाळा प्रकरणाचा तब्बल २१ वर्षानंतर निकाल लागला आहे. याप्रकरणी कारखान्याचे तत्कालीन चेअरमन दिवंगत पवनराजे निंबाळकर, माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यासह अन्य आरोपींची धाराशिव येथील न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.
‘शुगरटूडे’मध्ये प्रकाशित वृत्तानुसार याबाबत ॲड. शिंदे यांनी सांगितले की, २००१ साली तेरणा शेतकरी साखर कारखान्याने साखर विक्रीसाठी निविदा मागविल्या. संचालक मंडळाने मुंबईतील रिगल इनपेक्स यांच्या निविदेला मान्यता दिली. परंतु, कोलकाता येथील व्यापाऱ्यांना फ्री सेलची साखर दिली. चुकीच्या पद्धतीने साखर विक्री करून संचालक मंडळाने ४८ लाखांचा फायदा करून घेतला. कारखान्यास ९४ लाख ५९ हजारांचा तोटा झाला, अशी फिर्याद दाखल केली होती.
सीआयडीने कारखान्याच्या १६ पदाधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली होती. सुनावणीदरम्यान पवनराजेंची हत्या झाली होती. या प्रकरणी ॲड विजयकुमार शिंदे, पंडीत नळेगावकर, विश्वजीत शिंदे, निलेश बारखेडे, विष्णु डोके सुग्रीव नेरे, मडके व गोसावी यांनी काम पाहिले. डॉ. पद्मसिंह पाटील, पवनराजे निंबाळकर, रामेश्वर कारवा, शिवदास होनमाने, तानाजी शेंडगे, विवेक कुलकर्णी, राधेश्याम सोमाणी, मुकेश ओसवाल, ललित ओसवाल, अशोक शिनगारे, पवनकुमार झा उर्फ शर्मा, राजीव पाठक, मुकुंद पाठक, प्रमोद दिवेकर,मंगल बाळासाहेब पाटील, अब्दुल रशीद काझी यांची कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे.