कोल्हापूर : केनवडे (ता. कागल) येथील श्री अन्नपूर्णा शुगर ॲण्ड जॅगरी वर्क्स कारखान्याने चालू गळीत हंगामासाठी उसाला प्रती टन ३१०१ रुपये असा एकरकमी ऊस दर जाहीर केला आहे. वाढीव दराप्रमाणे ऊस बिलातील ८१ रुपये फरकाची मागील दोन पंधरावड्याची रक्कम शेतकऱ्यांना १६ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीतील ऊस बिलाबरोबर अदा करण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. कारखान्याचे चेअरमन, माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनी ही माहिती दिली.
माजी आमदार घाटगे म्हणाले की, कारखान्याने १५ ऑक्टोबरपर्यंत गाळप झालेल्या उसास प्रती टन ३,०२० रुपये दर दिला आहे. एकूण १० कोटी ५९ लाखांची ऊस बिले दिली आहेत. कारखान्यात प्रती दिन १०० मेट्रिक टन ऊस गाळप सुरू आहे. यंदा केमिकल फ्री गूळ पावडरचे उत्पादन घेणार आहे. शिवाय ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना बाहेरून विकत घेवून प्रती टन अर्धा किलो साखर दिली जाईल. यावेळी संचालक शिवशिंग घाटगे, विश्वास दिंर्डोले, धनाजी गोधडे, मल्हारी पाटील, सुभाष करंजे, एम. बी. पाटील, तानाजी पाटील, आनंदा साठे, के. के. पाटील, दिनकर पाटील, दत्तोपंत वालावलकर, राजू भराडे आदी उपस्थित होते.