सातारा : किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याने यंदा गाळपास येणाऱ्या उसाला प्रती टन ३,००० रुपये देण्यात येणार आहे. कारखान्याचे चेअरमन, आमदार मकरंद पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. कारखान्यावर असणारी प्रचंड देणी व अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून जातानाही सभासदांच्या व कामगारांच्या विश्वासामुळेच गेल्यावर्षी हंगाम सुरू करण्यास व सर्व देणी देण्यात आम्ही यशस्वी ठरलो. यंदाचा हंगामही वेळेवर सुरू करू शकलो ते सभासद, शेतकऱ्यांच्या योगदानामुळे असे आमदार पाटील यांनी म्हटले आहे.
आमदार मकरंद पाटील यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, मागील व्यवस्थापनांनी कारखान्यावर हजारो कोटींचे कर्ज केले. भ्रष्ट कारभारामुळे किसन वीर व खंडाळा कारखान्याची विश्वासार्हता धुळीस मिळाली होती. कोणतीही बँक या कारखान्यांना एक रुपयाचेही कर्ज देऊ शकत नव्हती. मात्र, सभासद शेतकरी व कामगारांनी मोठ्या विश्वासाने कारखान्याची सूत्रे आमच्याकडे दिली. शेतकरी हिताचे उद्दिष्ट ठेवून यंदा ३,००० रुपये दर देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. शेतकऱ्यांनी परिपक्व ऊस कारखान्याला गळीतास पाठवावा असे आवाहन चेअरमन, आमदार मकरंद पाटील, व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे, कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे व संचालक मंडळाने केले आहे.