कोल्हापूर : ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. 86032 या उसाच्या जातीला ठोस पर्याय निघाला आहे. फुले ऊस 15012 ही उसाची नवीन जात शेतकऱ्यांना उत्पादन वाढीसाठी हातभार लावू शकते. फुले 265 या अधिक ऊस उत्पादन देणाऱ्या आणि को 94008 या साखरेचा अधिक उतारा देणाऱ्या जातीच्या संकरातून विकसित करण्यात आलेली फुले ऊस 15012 ही जात शेतकऱ्यांना फायदेशीर ठरू शकते. राज्यात प्रामुख्याने 86032 ची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. मात्र आता शेतकऱ्यांनी फुले ऊस 15012 उसाची जात लावावी, असे शेती तज्ञांचे म्हणणे आहे.
उसाच्या 86032 जातीला ठोस पर्याय…
फुले ऊस 15012 ही मध्यम पक्व गटातील व जास्त उत्पादन देणारी जात आहे. पाडेगाव मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्राने फुले 265 व को 94008 या जातींच्या संकरातून फुले ऊस 15012 या जातीचे निर्मिती केली आहे. या जातीची सुरू, पूर्व हंगामी आणि आडसाली हंगामात पश्चिम महाराष्ट्रात लागवडीसाठी शिफारस करण्यात आली आहे. फुले ऊस 15012 आणि को 86032 या जातींच्या तुलनात्मक अभ्यास केला तर को ८६०३२ या जातीपेक्षा उत्पादन 16% आणि साखरेचे उत्पादन 15.51% जास्त मिळाले आहे. या जातीच्या ऊसातील व्यापारी शर्कराचे प्रमाण हे को 86032 पेक्षा 0.40 युनिट जास्त आहे आणि फुले 265 पेक्षा 0.80 युनिटने अधिक आहे.
…अशी आहेत फुले ऊस 15012 ची वैशिष्ट्ये
या जातीचा ऊस जाड व कांड्या सरळ असतात. पाण्याचा ताण सहन करणारी आणि जमिनीवर न लोळणारी जात आहे.या जातीला तुरा अल्प प्रमाणात आणि उशिरा येत असल्यामुळे जास्त पाऊस असल्यास किंवा जास्त पावसाच्या प्रदेशात कमी तुरा आल्यामुळे इतर उसाच्या जातींपेक्षा उत्पादनात वाढ होते. या जातीच्या उसाची पाने मध्यम रुंद आणि सरळ असल्यामुळे बाष्पीभवन देखील कमी होते.या जातीच्या पानावर कूस राहत नाही. या जातीचा खोडवा चांगला असतो.