सोलापूर : मंगळवेढा येथील संत दामाजी सहकारी साखर कारखान्याने 5 डिसेंबरअखेर 1,00,995 मेट्रिक टन ऊसाचे गाळप करून 91,800 क्विंटल साखरेचे उत्पादन केले. कारखान्याला सरासरी 9.20 टक्के साखर उतारा मिळाला आहे. कारखान्यात दररोज 3500 ते 3800 मेट्रिक टन ऊस गाळप होत आहे. हंगामात गळितास आलेल्या उसाचा पहिला हप्ता 2701 रुपयांप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला आहे, अशी माहिती कारखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील यांनी दिली.
चेअरमन पाटील म्हणाले की, दामाजी कारखान्याकडे कोणताही उपपदार्थ निर्मिती प्रकल्प नसताना ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विश्वासावर कारखाना पूर्ण क्षमतेने सुरू आहे. शेतकऱ्यांनी कोणत्याही काट्यावर आपला ऊस वजन करुन कारखान्याच्या वजन काट्यावर आणावा. प्रत्यक्ष वजनाची खात्री करावी. एकाच काट्यावर उसाचे वजन, बाहेर जाणाऱ्या साखर, मोलॅसिस, इतर व्यापाऱ्यांच्या वाहनांचे वजन केले जाते, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी व्हा. चेअरमन तानाजी खरात, संचालक मुरलीधर दत्तू, गौरीशंकर बुरकूल, गोपाळ भगरे, राजेंद्र पाटील, भारत बेदरे, दयानंद सोनगे, औदुंबर वाडदेकर, रेवणसिद्ध लिगाडे, भिवा दोलतडे, बसवराज पाटील, गौडाप्पा बिराजदार, दिगंबर भाकरे, महादेव लुगडे, तानाजी कांबळे, तानाजी काकडे, सुरेश कोळेकर, प्र. कार्यकारी संचालक रमेश जायभाय आदी उपस्थित होते.