बेळगाव : अवकाळी पावसाने सीमाभागात बिघडले ऊस तोडणीचे गणित

बेळगाव : चिकोडी उपविभागात झालेल्या अवकाळी पावसाने ऊस तोडणीचे गणित बिघडले आहे. ऊस व्यवस्थापन आणि साखर उद्योगावर बदलत्या हवामानाचा परिणाम झाला आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपूर्वी झालेला अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरणामुळे गळीत हंगामावर परिणाम झाला. या आठवड्यात ढगफुटीसदृश पाऊस झाला. ऊस, द्राक्ष बागेत पाणीच पाणी साचून राहिले. ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसामुळे ऊस गाळपाच्या उदिष्टपूर्तीचा प्रश्न निर्माण झाला आहे.

सीमाभागात मोठ्या प्रमाणात उसाचे उत्पादन घेतले जाते. त्यातील ऊस तोडणीत पावसाने अडथळा निर्माण केला आहे. अवकाळी पावसाने कारखानदारांसह शेतकरी, मजुरांना चिंता लागून राहिली आहे. पावसाने तोडणी कामात व्यत्यय निर्माण झाला आहे. भरलेली वाहने शेताबाहेर काढताना कसरत होत आहे. आणखी काही दिवस पावसाची शक्यता असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. काहीनी ऊस तोडणी यंत्र घेतले. त्यासाठी लाखो रुपयांचे कर्ज घेतले. आता अवकाळी पाऊस होत असल्याने ऊस तोडणी यंत्रणा ठप्प आहे. त्यामुळे तोटा सहन करावा लागत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here