केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी जागतिक स्तरावर भारताच्या क्षमतांवरील वाढता विश्वास आणि देशाची उंचावलेली प्रतिमा अधोरेखित केली.आज नवी दिल्ली येथे फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (फिक्की) चे वार्षिक अधिवेशन आणि 96 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत पीयूष गोयल यांचे भाषण झाले. यावेळी त्यांनी अफाट संधींची भूमी असलेला भारत ते ‘अपरिहार्य भारत’ हा कायापालट अधोरेखित केला आणि आगामी दशकांमध्ये जागतिक अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी भारत सज्ज असल्याचे नमूद केले.
भारताच्या परिवर्तनात्मक प्रवासाबाबत बोलताना गोयल यांनी उपस्थित प्रत्येकाने दाखवलेल्या सामूहिक वचनबद्धतेकडे लक्ष वेधले आणि भारताला समृद्धी आणि जागतिक लौकिकाकडे नेण्यात प्रत्येक व्यक्तीची महत्त्वपूर्ण भूमिका आहे यावर भर दिला. 2047 पर्यंत भारताला एक विकसित राष्ट्र बनवण्याचे उद्दिष्ट असलेल्या ‘अमृत काल’ च्या दूरदृष्टीचा त्यांनी पुनरुच्चार केला जी जागतिक स्तरावर देशासाठी निर्णायक ठरेल.
पुढील 25 वर्षांच्या मार्गदर्शक आराखडाबाबत बोलताना गोयल यांनी भारताला जगातील तिसरी-सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवण्याचे ध्येय असल्याचे सांगितले जी मजबूत उत्पादन क्षेत्राला चालना देईल, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष यामध्ये आघाडीवर असेल आणि सेवा क्षेत्राला अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड देईल.
प्रत्येक व्यक्तीचे सशक्तीकरण आणि मूलभूत गरजा सुनिश्चित करण्यावर सरकारचा भर असल्याचे नमूद करून गोयल यांनी डिजिटल इंडिया, स्वच्छ भारत मिशन आणि आर्थिक समावेशकता कार्यक्रम यासारख्या योजनांचा देशभरातील लाखो लोकांवर सकारात्मक प्रभाव पडत असल्याचे अधोरेखित केले. पायाभूत सुविधांच्या विकासात देश वेगाने प्रगती करत असून भारत मंडपम आणि दिल्लीतील नवीन संसद इमारत यासारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांमधून ते प्रतिबिंबित होते यावर त्यांनी भर दिला.
सर्वसमावेशक आणि शाश्वत विकासाप्रति सरकार वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार करत गोयल यांनी प्रमुख उद्योजकांना पंतप्रधानांच्या कल्पनेतील ‘विकसित भारत’ कार्यक्रमात सहभागी होण्याचे आणि राष्ट्राच्या सर्वांगीण आणि आशावादी भविष्याला अनुरूप प्रयत्न करण्याचे आवाहन केले .‘विकसित भारत’ राजदूत होण्यासाठी आणि भारताच्या विकास यात्रेचा अभिमानाने भाग होण्यासाठी त्यांनी उद्योजकांना प्रोत्साहित केले.
भारताबरोबर मुक्त व्यापार करार करण्यात जगाचे हित आणि जागतिक आव्हानांवर तोडगा काढण्यासाठी भारतावर जगाचे वाढते अवलंबित्व अधोरेखित करत, जागतिक गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी भारताने आपली ताकद वापरण्याची गरज आहे यावर त्यांनी भर दिला.
भाषणाचा समारोप करताना पीयूष गोयल यांनी भारताच्या क्षमतेवरच्या विश्वासाचा पुनरुच्चार केला आणि प्रत्येक आव्हानाला संधीत रूपांतरित करून आणि भारताच्या परिवर्तनात्मक विकासाच्या प्रवासात सामूहिक योगदान देऊन सक्रिय दृष्टीकोन अवलंबण्याचे आवाहन केले.
(Source: PIB)