कोल्हापूर : यंदा ऊस पिकाला उन्हाळ्यात पाणी कमी मिळणार या भीतीने जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी ऊस लागवडीकडे पाठ फिरवली आहे. काळम्मावाडी धरणाचीही पाणीपातळी गतीने घटत आहे. त्यामुळे पुढील वर्षी ऊस उत्पादनात घट होईल अशी शक्यता आहे. धरणाची गळती काढण्यासाठी ८० कोटींचा निधी मंजूर आहे. मात्र, गळती कधी काढणार व धरणात पाणी किती राहणार याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे.
शेतकऱ्यांनी यंदा माळरानावर ऊस लागवड केलेलीच नाही. दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात ऊस लागवडी करणारे काही शेतकरी डिसेंबर महिना आला तरी ऊस लागवड करायची की शाळू, मक्का उत्पादन घ्यायचे याविषयी संभ्रमात आहेत. बहुतांश शेतकऱ्यांनी शाळू, मका पिके घेतली आहेत. कमी पावसाने यंदा उसाला पाणी कमी मिळणार या भीतीपोटी ऊस लागणी काही प्रमाणात ठप्प आहेत. ज्यांच्याकडे स्वतःचा बोअर किंवा विहिरीचे पाणी आहे. त्यांनीच ऊस लागवड करावी. शेतकऱ्यांनी ८० टक्के अनुदानित ठिबक सिंचन योजनेचा लाभ घेऊन टंचाईवर मात करावी, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.