जळगाव : पाऊस थांबल्यानंतर गेल्या पाच ते सहा दिवसात खानदेशात ऊस गाळपाला वेग आला असून, सुमारे सहा लाख टन ऊसाचे गाळप आतापर्यंत झाले आहे. यंदा गाळप अधिक होईल, असा अंदाज आहे. गाळप करणाऱ्या कारखान्यांच्या संख्येत यंदा दोनने वाढ झाली आहे. मध्यंतरी ढगाळ, पावसाळी वातावरणामुळे ऊस गाळप थंड होते. यामुळे गाळपाचा आकडाही कमी दिसत होता. पण गेल्या १० दिवसात गाळपाला अधिक वेग आला आहे. गेल्या पाच ते सहा दिवसात दीड लाख टन ऊसाचे गाळप झाले आहे.
ॲग्रोवनमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, नंदूरबार जिल्ह्यात १२ हजार हेक्टरवर तर जळगाव जिल्ह्यात १४ हजार हेक्टरवर ऊस लागवड झाली आहे. धुळ्यात पाच हजार हेक्टरवर ऊस लागवड झाली होती. नंदुरबार जिल्ह्यात सर्वाधिक चार साखर कारखाने गाळप करीत आहेत. समशेरपूर (ता. नंदुरबार) येथील आयान कारखान्याने सर्वाधिक ऊस गाळप केले आहे. कारखान्याने यंदा सुमारे १२ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. यापाठोपाठ जळगाव जिल्ह्यातील मुक्ताई (ता. मुक्ताईनगर) कारखान्याने ऊस गाळप केले आहे. गेल्या हंगामात बंद असलेले जळगाव जिल्ह्यात चोपडा, चाळीसगाव येथेही कारखानेही गाळप करीत आहेत. धुळ्यातील लहान कारखान्यात रोज ५०० ते ७०० टन ऊस गाळप होत आहे.