नवी दिल्ली : केंद्र सरकारने इथेनॉलच्या दरात प्रती लिटर दहा रुपयांची त्वरित वाढ करावी, अशी मागणी इंडियान शुगर मिल्स असोसिएशनचे (इस्मा) उपाध्यक्ष एम. प्रभाकर राव यांनी केली आहे. राव हे १५ डिसेंबर रोजी ‘इस्मा’च्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारणार आहेत. सध्या आदित्य झुनझुनवाला हे अध्यक्ष असून, त्यांचा कार्यकाल १५ रोजी संपत आहे. केंद्र सरकारने जारी केलेल्या आदेशामुळे साखर उद्योगातील स्थिती पूर्णपणे बदलली आहे. उद्योगांचे नुकसान भरून निघावे यासाठी प्रयत्न व्हावेत, असे ‘इस्मा’चे म्हणणे आहे.
केंद्र सरकारने उसाचा रस आणि शुगर सिरपपासून इथेनॉल उत्पादनाला बंदी घातल्याने उत्पादन प्रक्रियेला खिळ बसेल असे राव यांनी ‘झी बिझनेस’शी बोलताना सांगितले. ते म्हणाले की, साखर उत्पादन कमी होण्याच्या शक्यतेने केंद्राने इथेनॉल उत्पादनावर निर्बंध घालणारा आदेश जारी केला. मात्र गेल्या दोन वर्षांत ‘इबीपी’मुळे साखर उद्योगाने इथेनॉल उत्पादन क्षेत्रात मोठी गुंतवणूक केली आहे. केंद्राच्या या निर्णयाचा उद्योगाला मोठा फटका बसेल. केवळ बी हेवी मोलॅसेसपासून उत्पादन करून ही मोठी तूट भरून येणार नाही. रस किंवा शुगर सिरपपासून जेवढे इथेनॉल उत्पादन होणार होते, तेवढे इथेनॉल बी हेवी मोलॅसिसपासून उत्पादन करण्याची परवानगी द्यावी आणि तो ऑईल कंपन्यांनी खरेदी करावा. तरच साखर उद्योगाला दिलासा मिळेल.