नगर : जिल्हा बँकेने १२७ कोटींच्या कर्ज वसुलीसाठी डॉ. तनपुरे कारखाना भाडेतत्त्वावर देण्यासाठी फेरनिविदा काढली आहे. कारखाना २५ वर्षे चालविण्यास दिला जाणार आहे. वार्षिक भाडे १७ कोटी ठेवण्यात आले आहे. दरम्यान, १३ टक्के व्याज दराप्रमाणे महिन्याला सव्वा कोटीचा बोजा कारखान्यावर वाढतच आहे.
राहुरी तालुक्याची कामधेनू समजल्या जाणाऱ्या डॉ. तनपुरे कारखान्याकडे जिल्हा बँकेचे ९० कोटींचे कर्ज आहे. आजअखेर या कर्जावर मुद्दलीच्या तुलनेत ४१ टक्केप्रमाणे सुमारे ३७.८७ कोटींचे व्याज झाले आहे. त्यामुळे आता कर्जाची रक्कम ही १२७.९० कोटीपर्यंत पोहचली आहे. या निविदेनुसार ५ ते १४ डिसेंबरपर्यंत निविदा विक्री सुरू असेल. एका निविदेची किंमत ही ३० हजार रुपये असून १५ ते १८ डिसेंबर मालमत्ता पाहणी करता येणार आहे.
१९ डिसेंबर निविदा सादर करण्याची अंतिम मुदत असणार आहे. कारखान्यात ४२५० मे.टन गाळप क्षमता असलेली मिल आहे. डिस्टलरी प्रकल्प भाडेतत्वावर देण्यात येणार आहे. कारखाना जो चालवायला घेणार आहे, त्याच्याशी करारनामा करून ठरलेल्या भाडे रक्कमेतून कारखान्यावरील कर्ज वसूली केली जाणार आहे.