कोल्हापूर : उसाच्या तोडणीवरून राजाराम सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक आणि शेतकऱ्यांत वादावादी झाली. आठ दिवसांत तोडणीमध्ये सुधारणा न झाल्यास कारखान्याची वाहने अडवून कारखाना बंद पाडू, असा इशारा शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने दिला. यावेळी शेतकरी आणि कार्यकारी संचालकांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. यावेळी संचालक दिलीप उलपे उपस्थित होते.
राजकीय आकसापोटी कारखान्याकडून ठरावीक शेतकऱ्यांची नावे टाकून आलेल्या यादीनुसारच उसाच्या तोडी दिल्या जातात. काही जणांच्या उसाची तारीख टळूनही त्यांच्याकडे लक्ष दिले जात नाही, असा आरोप शिष्टमंडळाने केला. कारखान्याचा गळीत हंगाम सुरू होऊन महिना होत आला; पण अजूनही ऊसतोड यंत्रणा विस्कळीत आहे. विरोधी गटाच्या शेतकऱ्यांचा ऊस असल्याने तो तोडला जात नाही, असा आरोप शेतकऱ्यांनी केला.
यावेळी दिनकर पाटील (वाशी), बाजीराव पाटील (शिये), दिगंबर मेडशिंगे (कांडगाव), प्रमोद जाधव (खोची), दिलीप पाटील (टोप), रघुनाथ चव्हाण (कांडगाव,) मोहन सालपे, डॉ. संदीप नेजदार, मिलिंद पाटील, जयसिंग ठाणेकर, प्रशांत पाटील (कसबा बावडा), दगडू चौगले (धामोड), बळवंत गायकवाड (आळवे) आदी उपस्थित होते.