सांगली : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्ह्यात ऊस दरासाठीचे आंदोलन तीव्र केले आहे. दत्त इंडिया (वसंतदादा साखर) कारखान्याने ऊस दराचा अंतिम निर्णय घेतला आहे. आरळा येथील निनाईदेवी (दालमिया भारत शुगर) कारखान्याने शनिवारी निर्णय घेऊ, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील उर्वरीत १४ कारखान्यांच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन सुरूच राहील, असे संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी जाहीर केले आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दत्त इंडिया कारखान्याच्या प्रवेशद्वारावर जवळपास ३६ तास आंदोलन केले. सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षेतखालील बैठकीतही तोडगा निघाला नव्हता. त्यानंतर ‘स्वाभिमानी’ने आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला. त्यानंतर रात्री दहा वाजता दत्त इंडिया प्रशासनाने दर देण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले. जिल्हाधिकाऱ्यांकडून स्वाभिमानी शेतकरी संघटनेला एफआरपीपेक्षा अधिक दर देण्याचे कारखान्याने मान्य केल्याचे पत्र देण्यात आले. त्यानंतर वसंतदादा कारखान्यासमोर सुरू असलेला काटा बंद आंदोलन राजू शेट्टींनी मागे घेतले. आता शनिवारी (16 डिसेंबर 2023) याबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार असल्याचे सांगण्यात आले.