कोल्हापूर : हातकणंगले आणि आजरा या तालुक्यात शेतातील उभा ऊस पेटण्याच्या घटनांमुळे खळबळ उडाली आहे. कबनूर बायपास रोडवर असलेल्या लागलेल्या आगीत जवळपास १५ एकर पेक्षा जास्त ऊस जळाला आहे. तर आजरा तालुक्यातही अशीच घटना घडली. धनगरमोळा येथे साडेतीन एकरातील ऊस जळून खाक झाला. यात शेतकऱ्यांचे सुमारे ४० लाख रुपयांचे नुकसान झाले.
हातकणंगले तालुक्यातील कबनूर बायपास रोडवर लागलेल्या आगीत जयकुमार कोले यांचा १२ एकर, आप्पासाहेब निंबाळकर यांचा ३ एकर, सुभाष कोले यांचा अर्धा एकर अशा एकूण साडेपंधरा एकरातील उसाला आग लागली. आग आटोक्यात आणण्यासाठी पंचगंगा साखर कारखान्याच्या अग्निशामक बंबानेही शर्थीचे प्रयत्न केले. मात्र आगीत ३५ ते ३६ लाखांचे नुकसान झाले. दरम्यान, धनगरमोळा (ता. आजरा) येथे लागलेल्या आगीत साडेतीन एकरावरील ऊस जळाला. यात शेतकरी अंकुश विठ्ठल पाटील यांचे साडेतीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. धनगरमोळा व सुळेरान परिसरालगत नलवडे फार्मजवळ माजी सैनिक शेटगे यांचे शेत आहे. तेथे दुपारी साडेबाराच्या सुमारास ही आग लागली.