मजुरी वाढ बैठक निष्फळ : ऊस तोडणी कामगारांचा ‘कोयता बंद’चा इशारा

पुणे : ऊस तोडणीसाठी प्रती टन ४१० रुपये देण्याची सर्व ऊस तोडणी कामगार संघटनांनी केलेली मागणी मान्य करण्यास राज्य सहकारी साखर संघाने नकार दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य ऊस तोड कामगार मुकादम व वाहतूक संघटनेच्या सर्व संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. आगामी दहा दिवसांत मागणी पूर्ण न झाल्यास २५ डिसेंबरपासून ‘कोयता बंद’ आंदोलन करू, असा इशारा सर्व संघटनांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिला.

ऊस तोडणी आणि भरणीच्या दरात ५५ टक्के वाढ करण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत साखर महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसमवेतच्या बैठकीत एकमत होऊ शकले नाही. राज्यात ऊस तोडणी मजुरीचा प्रचलित दर सध्या २७३ रुपये १० पैसे आहे. या दरात किमान ५० टक्के वाढीवर तडजोडीची भूमिका कामगार संघटनांनी मांडली. हा दर प्रती टन ४१० रुपये करण्याची मागणी केली. राज्य सहकारी संघाने २७ टक्के दरवाढीची तयारी दर्शवली. मात्र, निर्णय झाला नाही. बैठकीला राज्य सहकारी साखर महासंघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील आणि ऊसतोड कामगार संघटनांचे डॉ. डी. एल. कराड, दत्ता डहाके, सुखदेव सानप, प्रा. सुशीला मोराळे, दत्तात्रेय भांगे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here