सोलापूर : कन्हेरगाव येथील आदिनाथ सहकारी साखर कारखाना बंद करण्याचा सल्ला देण्यासाठीच मंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या आदेशाने नेमलेल्या संचालक मंडळाने ‘आदिनाथ’ वर सल्लागार मंडळ नेमले होते का ? असा सवाल बारामती ॲग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांनी उपस्थित केला. कारखान्याविषयी बोलताना सुभाष गुळवे यांनी प्रशासकीय मंडळ व सल्लागार मंडळावर जोरदार टीका केली. ऊस उपलब्ध होत नसल्याने कारखान्याचे गाळप होत नाही.
गेल्या आठवड्यात आदिनाथ कारखान्यावर हरिदास डांगे, डॉ. वसंत पुंडे, धुळाभाऊ कोकरे, सुहास गलांडे व अच्युत तळेकर यांची सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली. डांगे यांनी कारखान्यावर बैठक बोलावून ऊस मिळत नसल्याने कारखाना चालवून जास्त तोट्यात जात आहे. त्यामुळे कारखाना बंद करून निवडणूक घ्यावी, असा सल्ला दिला आहे. याबाबत गुळवे म्हणाले की, आदिनाथ कारखाना बारामती ॲग्रोला भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय झाल्यानंतर डांगे, पुंडे, महेश चिवटे व इतरांनी एकत्र येत आदिनाथ बचाव समिती स्थापन केली आहे. कारखाना वाचवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे सोंग केले. कारखान्यावर मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी आपल्या सोयीचे प्रशासक नेमले आहेत. प्रशासकीय संचालक गुटाळ यांनी कारखान्याला मदत मिळाली नसल्याचे मान्य केले आहे. यावरूनच सर्व प्रकार लक्षात येतो, असेही ते म्हणाले.