सांगली : उसाचे एकरी उत्पादन वाढावे, यासाठी क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याकडून दरवर्षी विविध ऊस विकास योजना राबविल्या जातात. ऊस शेतीतील कामामध्ये पुरुषांपेक्षा महिलांचा अधिक सहभाग दिसतो. त्यामुळे ऊस शेतीमध्ये सुधारणांसाठी महिलांचे योगदान मोलाचे आहे, असे प्रतिपादन कारखान्याचे मार्गदर्शक संचालक, आमदार अरुण लाड यांनी केले. कारखान्यामार्फत आयोजित महिला शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते.
आमदार लाड म्हणाले की, ऊस शेतीतील नवे तंत्रज्ञान समजावे, म्हणून गेल्या दहा वर्षापासून महिलांना स्वतंत्रपणे प्रशिक्षण दिले जात आहे. उपक्रमात मोठ्या संख्येने महिला सहभागी होतात ही मोलाची बाब आहे. दरम्यान, यावेळी ऊस तज्ज्ञ सुरेश माने-पाटील यांनी खोडवा व्यवस्थापन, ‘इफ्को’चे जिल्हा व्यवस्थापक विजय बुनगे यांनी नॅनो रासायनिक खते या विषयांवर आणि पशुधन विकास अधिकारी डॉ. पी. एन. पाटील यांनी किफायतशीर दुग्धोत्पादन या विषयांवर मार्गदर्शन केले. कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड, संचालक दिलीप थोरबोले, संजय पवार, अशोक विभुते, सुभाष वडेर, संचालिका अंजना सूर्यवंशी, कार्यकारी संचालक चंद्रकांत गव्हाणे, सचिव आप्पासाहेब कोरे, शेती अधिकारी दिलीप पार्लेकर आदी उपस्थित होते.