नवी दिल्ली : केंद्र सरकारने उसाच्या रसापासून इथेनॉल उत्पादन करण्यास बंदी घातली आहे. ऊसापासून इथेनॉल उत्पादनाला बंदी घातली असताना मक्का पिकाला यातून वगळले आहे. त्यामुळे इथेनॉलसाठी मक्याला मागणी वाढेल, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. एक टन मक्यापासून ३७० लिटर इथेनॉल मिळते. त्यामुळे मक्का पिकाला चांगले दिवस येण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडण्याची शक्यता आहे.
गेल्या हंगामात ३५९ लाख टन मक्का उत्पादन झाले. यावर्षी हे उत्पादन ३४३ लाख टन होण्याची शक्यता आहे. कमी पावसाने यंदा मक्का उत्पादन घटण्याची चिन्हे आहेत. उसापासून इथेनॉल निर्मितीवरील बंदीमुळे धान्यापासून इथेनॉल उत्पादन वाढीची चिन्हे आहेत. सद्यस्थितीत देशात मक्याचा पुरवठा आणि दर स्थिर आहेत. त्यामुळे मक्याचा वापर वाढू शकतो. देशात ३२५ लाख टन मक्याचा वापर होण्याचा अंदाज आहे. यापैकी २०० लाख टनाचा वापर पशूखाद्यासाठी होईल. मानवी आहार, बियाणे, औद्योगिक वापरास १२५ लाख टन मका वापरला जाईल असा अंदाज आहे.