धुळे : यंदा शिरपूर साखर कारखान्याची चिमणी पेटलीच नाही, त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. कारखाना सुरु झाला असता तर हजारो शेतकऱ्यांसह कारखान्यावर अवलंबून शेकडो कामगारांना दिलासा मिळाला असता. दहीवद (ता. शिरपूर) येथील शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर देण्याची मागील वर्षातील प्रक्रिया यशस्वी झाली नाही. आता कारखाना भाडेतत्त्वावर देण्याची प्रक्रिया पुन्हा राबविण्याची गरज आहे. कारखाना बंद असल्याने परिसरातील ऊस क्षेत्रात दिवसेंदिवस घट होत आहे.
कारखाना भाडेतत्त्वावर देण्यासाठी मागील वर्षी सभासदांनी विशेष सर्वसाधारण घेऊन बहुमताने मंजुरी दिली होती. हा कारखाना सुरू करण्याच्या अनुषंगाने कार्यवाही सुरू झाली होती. निविदा प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविली. इच्छुकांनी या प्रक्रियेत सहभाग घेतला. परंतु या प्रक्रियेस प्रतिसाद मिळाला नाही. शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखाना शिरपूर, साक्री व नजीकच्या जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यासाठी वरदान ठरू शकतो. त्यामुळे हा कारखाना सुरु करावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.