हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.
पुणे : चीनीमंडी
राज्यात गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही विक्रमी साखर उत्पादन झाले असून, साखर कारखान्यांमध्ये साखर साठवून कोठे ठेवायची असा गहन प्रश्न उभा राहिला आहे. यंदाच्या हंगामात राज्यात १०७.१९ लाख टन साखर उत्पादन झाल्याचे आकडे समोर आले आहेत. त्यातच देशातील बाजारात साखरेला फारसा उठाव नसल्यामुळे आणि निर्यातीलाही अपेक्षित गती नसल्यामुळे कारखान्यांच्या गोदामांमध्ये साखर पडून आहे. अनेक ठिकाणी कारखान्यांमध्ये उघड्यावर साखरेची पोती ठेवण्यात आली असून, पावसापासून संरक्षण करण्यासाठी त्यावर ताडपत्री टाकण्यात आली आहे. काही ठिकाणी तात्पुरती पत्र्याची शेड उभारण्यात आली आहेत. आता वळवाच्या पावसाचे दिवस असल्याने अचानक येणाऱ्या या पावसापासून साखर वाचवायची कशी? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
अतिरिक्त उत्पादन आणि विक्रीला मिळणारा अत्यल्प प्रतिसाद यामुळे कारखान्यांना आणि व्यापाऱ्यांना साखरेची गोदामे अपुरी पडत आहेत. साखर साठवण्यासाठी आता जादा खर्च करण्याची वेळ कारखान्यांवर आली आहे. त्यामुळे आता नवीन गोदामे उभारण्यासाठी कारखान्यांना अल्पदराने कर्ज पुरवठा करण्याची मागणी होऊ लागली आहे. सध्या साखर वखार महामंडळात ठेवण्याचा पर्याय चर्चेत असला तरी, त्या गोदामांचे भाडे कारखान्यांना परवडणारे नाही, असे मत सातारा जिल्ह्यातील सह्याद्री कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी मांडले आहे.
दरम्यान, यंदाचा गाळप हंगाम सुरू झाला त्यावेळी १ ऑक्टोबर २०१८ रोजी राज्यात ५३ लाख टन साखर शिल्लक होती. त्यात यंदाच्या हंगामातील १०७ लाख टन साखरेची भर पडली आहे. त्यामुळे एकूण साखर १६० लाख टन झाली. त्यातील ६२ लाख टन साखरेची विक्री आणि निर्यात झाली आहे. त्यामुळे सद्याच्या घडीला राज्यात ९८ ते ९९ लाख टन साखर शिल्लक असल्याचे सांगतले जाते. त्याची ३१०० रुपये क्विटल दरान किंमत केली तर ती ३१ हजार कोटी रुपये होत आहे.