पुणे : यंदा श्री छत्रपती सहकारी कारखान्याने मळी व साखरेची विक्री करण्याची घाई करू नये. यंदा उसाचे उत्पादन कमी असल्याने मळी, साखरेचे दर वाढणार आहेत. कारखान्याला व सभासदांना त्याचा फायदा होणार आहे. बाजारपेठेचा अभ्यास करूनच मळी, साखरेची विक्री करण्यात यावी अशी मागणी साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी केली आहे. याबाबत त्यांनी श्री छत्रपती कारखाना व्यवस्थापनाला निवेदन दिले आहे.
पृथ्वीराज जाचक यांनी निवेदनात म्हटले आहे की, यापूर्वी कारखान्याने मळी व साखरेची आगाऊ विक्री केली. त्याचा फटका उसाच्या दराला बसला. कारखान्याने बाजारपेठेचा अभ्यास करूनच मळी व साखर विकण्याची आवश्यकता आहे. यंदा नवीन इथेनॉल धोरणामुळे मळीचे दरदेखील कमी होणार नाहीत. तसेच सध्याच्या गाळपात गेटकेन उसाचे प्रमाण जास्त दिसून येत आहे. संचालक मंडळाने सभासदांच्या ऊस गाळपासाठी प्राधान्य द्यावे. भाटघर धरणातून पाण्याच्या दोन पाळ्या मिळणार आहेत, त्यामुळे सभासदांच्या उभ्या उसाचे लवकर गाळप करणे गरजेचे आहे. सभासदांच्या उसाच्या गाळपाला प्राधान्य न दिल्यास गेटकेन बंद करण्यासाठी आंदोलन करावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.