सांगली : दालमिया भारत शुगर- निनाईदेवी युनिटच्या ऊस विकास योजनेला यश मिळताना दिसून येत आहे. कारखान्याने सॉलिडरिडॅड रिजनल एक्स्पर्टीज सेंटरमार्फत बायर फूड चेन संस्थेच्या सहकार्याने गेल्या वर्षीपासून सुरू केलेल्या ‘पुनर्विकसित शेती व शाश्वत ऊस विकास’ कार्यक्रम राबवला. यातून मार्गदर्शन घेतलेल्या शिराळा येथील शेतकरी सुभाष बापुसो नलावडे यांनी एकरी १०९ टन ऊस उत्पादन घेतले आहे.
सुभाष नलावडे यांनी जुलै २०२२ मध्ये मध्यम प्रतीच्या जमिनीमध्ये को-८६०३२ या जातीची दोन डोळा कांडी पद्धतीने ऊस लागवड केली होती. दीड फुटाच्या अंतरावर आडसाली लागण करून पाटपाणी पद्धतीने गरजेनुसार पाणी दिले. खर्च वजा जाता २,५३,००० रुपये निव्वळ उत्पन्न मिळाले आहे. याबाबत दालमिया शुगरच्या निनाईदेवी युनिट हेड संतोष कुंभार म्हणाले की, मी या यशाबद्दल सुभाष नलावडे आणि आमच्या शेती टीमचे अभिनंदन करतो. डोंगरी भागातील शेतकऱ्यांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी आम्ही भविष्यातही शेतकऱ्यांना शाश्वत ऊस शेतीविषयी मार्गदर्शन देत राहू.