कोल्हापूर : हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत-अथर्व साखर कारखान्याची ३० नोव्हेंबर अखेर गाळपाला आलेल्या ३२ हजार २७७ टन उसाची बिले प्रतिटन ३१०० रुपयांप्रमाणे संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केली आहेत, अशी माहिती अथर्व कंपनीचे अध्यक्ष मानसिंग खोराटे यांनी दिली.
खोराटे म्हणाले, सध्या कारखान्याने १ लाख टन गाळप पूर्ण केले आहे. स्थानिक शेतकऱ्यांची ऊस तोडणी वेळेत करण्यावर भर दिला आहे. अथर्व-दौलत कारखान्याने १३ डिसेंबर रोजी सर्वाधिक ५ हजार २३१ मे. टन ऊस गाळप केला. अथर्व प्रशासनाने दौलत साखर कारखाना चालवायला घेतल्यापासून हे सर्वाधिक गाळप केले आहे. ते म्हणाले, तीन वर्षात कंपनीने उसाची बिले वेळेवर देऊन शेतकऱ्यांचा विश्वास मिळवला आहे. भागातील शेतकऱ्यांनी संपूर्ण ऊस कारखान्याला देऊन सहकार्य करावे, असे आवाहन खोराटे व सचिव विजय मराठे यांनी केले आहे.