पुणे : राज्यात गाळप हंगाम वेगात सुरु झाला आहे. आतापर्यंत राज्यातील कारखान्यांकडून २८३ लाख टन उसाचे गाळप पूर्ण झालेले आहे. राज्यात ८.३८ टक्के सरासरी उताऱ्यानुसार २३ लाख ७२ हजार टनांइतके साखरेचे उत्पादन हाती आले आहे. पुणे विभागाने सर्वाधिक ६६.९३ टक्क्यांइतके सर्वाधिक ऊस गाळप आणि ५७.५२ लाख किंवटल साखर उत्पादन घेतले आहे. कोल्हापूर विभाग ९.४८ टक्के साखर उताऱ्यासह राज्यात आघाडीवर आहे. एकूण १९१ साखर कारखान्यांची दैनिक ऊस गाळप क्षमता ८ लाख ९४ हजार १०० टनांइतकी आहे. गतवर्षी १४ डिसेंबरअखेर ३५६ लाख टन उसाचे गाळप पूर्ण झाले होते. याचा विचार करता यंदा ७३ लाख टनांनी ऊस गाळप कमी झाले आहे.
यंदा गाळप हंगामात सुमारे १ हजार २२ लाख ७३ हजार टन ऊस उपलब्ध राहण्याचा साखर आयुक्तालयाचा प्राथमिक अंदाज आहे. प्रत्यक्षात ९२१ लाख टन ऊस गाळपातून १०३ लाख ५८ हजार टनांइतके साखरेचे उत्पादन हाती येण्याचा अंदाज हंगामपूर्व मंत्री समितीच्या बैठकीत वर्तविण्यात आला होता. कोल्हापूर विभागातील कारखाने उशिराने सुरू झाले असले, तरी गाळपाचा वेग वाढला आहे. राज्यात ९३ सहकारी व ९८ खासगी कारखाने गाळप करीत आहेत. राज्यात दुष्काळाची स्थिती असून, पाण्याची उपलब्धता कमी आहे. त्यामुळे प्रत्यक्षात गाळपासाठी अपेक्षेपेक्षा कमी उसाची उपलब्धता राहून साखर उत्पादनही घटण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.