अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील १४ कारखान्यांनी १७ डिसेंबरअखेर २८ लाख ८५ हजार ९६६ टन उसाचे गाळप केले आहे. कारखान्यांनी २४ लाख २३ हजार ४३५ पोती साखर उत्पादित केली आहे. तर जिल्ह्याचा सरासरी साखर उतारा १४.८९ टक्के आहे. केंद्र शासनाने उसाचा रस / साखरेचा पाक तसेच बी. हेवी मोलॅसिसपासून थेट इथेनॉल तयार करण्याच्या निर्णयाला दिलेली स्थगिती अंशतः उठविल्यामुळे इथेनॉल निर्मिती करणाऱ्या ११ कारखान्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
११ सहकारी व ३ खासगी कारखान्यांचे गाळप सुरू आहे. यामध्ये अंबालिका (जगदंबा) या खासगी कारखान्याने सर्वांधिक चार लाख टन उसाचे गाळप केले आहे. दरम्यान, काही प्रमाणात थंडी जाणवू लागल्यामुळे उसाचा उतारा वाढला आहे. अवकाळी पावसाची शक्यता पुन्हा व्यक्त झाल्यामुळे आगामी काळात ऊस तोडणीच्या अडचणी येतील अशी शक्यता आहे. ऊस तोडणी कामगारांचा तुटवडा जाणवत असल्याने कारखान्यांपुढे समस्या निर्माण होईल. दरम्यान, इथेनॉल निर्मितीतून मिळणाऱ्या आर्थिक लाभातून शेतकऱ्यांना एफआरपी चांगला लाभ मिळण्याची शक्यता आहे.