सांगली : वाळवा तालुक्यातील शिरगाव येथील मसोबा परिसरात वस्तीला असलेल्या ऊस तोडणी मजुरांच्या १६ झोपड्यांमध्ये सोमवारी अज्ञाताने चोरी केली. भरदिवसा चोरट्याने सुमारे १ लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख ८० हजारांची रक्कम लंपास केली. यावेळी चोराने धान्य, मुलांचा खाऊ, इतर वस्तूही लंपास केल्या.
हुतात्मा आणि क्रांती साखर कारखान्याला ऊसतोड करणारे मजूर शिरगाव येथील अशोक चव्हाण यांच्या शेतात १६ झोपड्यांमध्ये राहतात. हे मजूर पहाटे ५ वाजता बायका-मुलांसह एक किलोमीटरवर उसाच्या फडाकडे गेले. झोपड्यांचे दार कापडाने झाकले होते. सकाळी अज्ञात चोरट्यांनी झोपड्यांतील पत्र्याच्या पेट्या फोडून सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम व इतर वस्तू लंपास केल्या. ऊस तोडणी मजूर महिला उसाचे वाडे विकून पैसे साठवतात. त्यावरच रोजचा खर्च चालतो. दुपारी चोरीचा प्रकार मजुरांच्या लक्षात आला. महिलांनी खोपटात धाव घेऊन एकच हंबरडा फोडला. या चोरीची नोंद आष्टा पोलिसांत झाली आहे. सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक मनमित राऊत यांनी भेट देऊन घटनेची माहिती घेतली.