कोल्हापूर : यावर्षी ऊस दर आंदोलनामुळे कारखान्यांचा गळीत हंगाम उशिरा सुरू झाला. पुरेशा तोडणी यंत्रणेअभावी उसाला तुरे फुटू लागले आहेत. त्यामुळे उसाला लवकर तोड मिळावी, यासाठी शेतकरी प्रयत्न करीत आहेत. दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी, शेतकऱ्यांनी कारखान्याच्या कार्यालयांमध्ये निवेदन देऊन लवकर ऊस तोडणीची मागणी केली आहे.
कुरुंदवाड परिसरात उसाचे क्षेत्र अधिक आहे. गेल्यावर्षी जून- जुलै महिन्यात लागण केलेल्या उसाला १७ ते १८ महिने होत असून तुरे फुटले आहेत. तोडणीसाठी कारखान्यांकडे पुरेशी यंत्रणा नाही. परिसरात काही ठिकाणी कारखान्यांच्या टोळ्या उसाची तोड करीत आहेत. ही यंत्रणा पुरेशी नाही. त्यामुळे ऊस तोड कधी होणार, याची शेतकरी वाट पाहात आहेत. उसाला तुरे फुटल्याने वजन घटणार असून याचा तोटा सहन करावा लागणार आहे. कारखान्यांनी लवकर ऊस तोड करावी, अशी मागणी निवेदाने केली. यावेळी अनिल पाटील, अशोक पाटील, सचिन चौगुले, प्रमोद चौगुले, बाबासाहेब पाटील, आदिनाथ भबीरे आदी उपस्थित होते.