सांगली : सांगली जिल्ह्यातील 15 साखर कारखान्यांनी 24.98 लाख टन ऊसाचे गाळप केले असून 23.52 लाख क्विंटल साखर उत्पादित झाली आहे. साखर हंगाम सुरु होऊन दीड महिना झाला तरी शेतकरी ऊस बिलांच्या प्रतीक्षेत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात बहुतांश साखर कारखान्यांनी ऊस बिले जमा केली असताना सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नशिबी मात्र प्रतीक्षाच आली आहे. सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडे 550 कोटींपेक्षा जास्त ऊसबिले थकली आहेत.
ऊस गाळपसाठी गेल्यानंतर 14 दिवसांत बिल जमा करणे बंधनकारक असतानाही कारखान्यांनी बिले देण्यास टाळाटाळ सुरु केली आहे. कारखान्यांनी ऊस दर नियंत्रण कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप शेतकरी संघटनांनी केला आहे. जिल्ह्यातील साखर कारखाने प्रतिदिन सुमारे 75 हजार टन गाळप करीत आहेत. आतापर्यंत 30 लाख टन गाळप झाले. साखर कारखान्यांनी प्रत्येकी 1 लाख ते 2 लाख 75 हजार टनांपर्यंत गाळप केले आहे. महिना उशीर झाल्याने 550 कोटींपेक्षा जास्त ऊसबिले थकली आहेत.