छत्रपती संभाजीनगर : शेतकऱ्यांनी उसाचे, गव्हाचे पीक घेतल्यानंतर पाचट-धसकट जाळू नये. धसकट, पाचट जाळल्याने जमिनीला आणि वातावरणाला तोटाच होतो. गव्हाचे धसकट आणि उसाचे पाचट शेतात कुजून जमिनीतीला सेंद्रिय कर्ब सुधारतो. परिणामी पिकाला पोषक तत्त्व मिळतात, उत्पादन वाढते, असे मत शेतीतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. दरवर्षी ऊस तोडणी झाल्यानंतर शेतकरी पाचट जाळतात. मात्र, पाचट जाळू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
कृषी तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार उसाचे पाचट हे जमिनीचा पोत सुधारण्यासाठी उत्तम असा सेंद्रिय पदार्थ आहे. पाचट शेतात सडू द्यायला हवे. मका, गव्हाच्या काड्या, धसकट जाळू नका. खरीप हंगामासाठी शेत तयार करण्यासाठी शेतकरी सर्वप्रथम गव्हाच्या काड्या आणि धसकट जाळून टाकतात. मात्र, या काड्या आणि धसकट जाळून न टाकता शेतकऱ्यांनी त्यावर नांगरणी करावी. धसकट जमिनीत सडून त्याचे खत होईल. हे खत पुढील पिकासाठी उत्तम असे टॉनिक असते, असे विना मशागत शेतीचे पुरस्कर्ते सुरेश बेडवाल यांनी सांगितले. तर जिल्हा कृषी अधीक्षक प्रकाश देशमुख म्हणाले की, गव्हाच्या काड्या, उसाचे पाचट शेतात सडू दिल्यास जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढतो. जमिनीची सुपीकता चांगली होवून पुढील पिकाचे उत्पादन वाढते.