अहमदनगर : साखर उद्योग शेतकऱ्यांशी निगडित आहे. मात्र, शेतकऱ्यांना चांगले दर देता यावेत यासाठी साखरेची आधारभूत किंमत वाढविण्याची, कारखान्यांतून उत्पादित होणारी वीज चांगल्या दराने खरेदी करण्याची व इथेनॉल निर्मितीबाबत कारखान्यांवर घातलेली मर्यादा उठविण्याची गरज आहे. ही बाब लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने माजी मंत्री व ‘लोकमत’चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांच्यासमोर मांडली.
दर्डा यांनी कारखाना कार्यस्थळाला भेट देऊन कारखाना, कारखान्याचा सहवीज निर्मिती प्रकल्पाची पाहणी केली व साखर कारखानदारीसमोरील समस्या जाणून घेतल्या. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष, माजी आमदार नरेंद्र घुले-पाटील, कारखान्याचे उपाध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग, कार्यकारी संचालक अनिल शेवाळे यांनी विविध समस्यांचे निवेदन दर्डा यांना दिले.
घुले म्हणाले, ऊस गाळप केल्यानंतर एफआरपी १५ दिवसांत देणे कायद्याने बंधनकारक आहे. केंद्र शासनाने साखरेची आधारभूत किंमत मात्र गेल्या चार वर्षांपासून प्रती किलो ३१ रुपये निश्चित केलेली आहे. आधारभूत किंमत ३१ रुपयेच असल्याने बँक त्याप्रमाणेच कारखान्यांना कर्ज देते. पर्यायाने कारखान्यास १५ दिवसांत बिल देणे व इतर खर्च भागविणे जिकिरीचे होते. त्यामुळे केंद्राने साखरेची आधारभूत किंमत ३५ ते ३६ रुपये करणे गरजेचे आहे. यावेळी कारखान्याचे सचिव रवींद्र मोटे, अशोकराव मिसाळ, काशिनाथ नवले, मुख्य अभियंता राहुल पाटील यावेळी उपस्थित होते.