राहुरी : राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने उसावरील ‘चाबूक काणी रोगासाठी प्रतिकारक्षम स्रोतांची नोंदणी केल्याची माहिती कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांनी दिली. चालू वर्षी, २०२३ मध्ये त्यातील दोन जननद्रव्ये नोंदविण्यात आली आहेत. त्यामुळे उसाची उत्पादन वाढ, साखर उतारा वाढविण्यास अनुकूल वाणांची निर्मिती होण्यास मदत मिळणार आहे. विद्यापीठाने जननद्रव्ये म्हणून नोंदणी केलेल्यामध्ये को एम ७६०१ व एमएस ७६०४ (सन २०१६) आणि को- एम ११०८६ व को एम १३०८३ (सन २०२३) यांचा समावेश आहे.
महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या संशोधनानुसार, उसाचे उत्पादन आणि साखर उतारा वाढविणाऱ्या वाणांची निर्मिती होणार आहे. उसावर येणाऱ्या चाबूक काणी या रोगाला प्रतिकार करू शकणाऱ्या चार जननद्रव्यांची (जर्मप्लाझम) नोंदणी विद्यापीठाने नवी दिल्लीच्या राष्ट्रीय वनस्पती अनुवंशिक संसाधन ब्युरोच्या अंतर्गत जननद्रव्य संरक्षण विभागात केली आहे. पाडेगाव (जि. सातारा) येथील मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्रात हे संशोधन करण्यात आले.