कोल्हापूर : ऊस तोडणीच्या दरवाढीसंदर्भात साखर संघ व ऊसतोडणी कामगार संघटनेच्या प्रतिनिधींमध्ये सकारात्मक चर्चा झाली. याबाबत ५ जानेवारी रोजी पु्न्हा बैठक होईल. त्यामध्ये अंतिम निर्णय होणार आहे. ही बैठक होईपर्यंत ऊसतोडणी बंद आंदोलन स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा ऊस तोडणी कामगार संघटनेने केली आहे. ऊस तोडणी मजुरांच्या दरवाढप्रश्नी कामगार संघटनांनी बेमुदत कोयता बंद आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर साखर संघाने बुधवारी पुण्यातील मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये ही बैठक घेतली.
बैठकीस साखर संघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील, राष्ट्रीय फेडरेशनचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, आम. प्रकाश सोळंके, आम. प्रकाश आवाडे, कल्याणराव काळे, संजय खताळ तर कामगार संघटनांचे डॉ. डी. एल. कराड, आम. सुरेश धस, डॉ. सुभाष जाधव, प्रा. आबासाहेब चौगले, दत्ता डाके, जीवन राठोड, सुखदेव सानप, दादा मुंडे, श्रीमंत जायभावे आदी उपस्थित होते. बैठकीत सकारात्मक चर्चा झाली; परंतु तोडगा निघाला नाही. साखर संघाच्या प्रतिनिधींनी ५० टक्के वाढ देणे शक्य नसल्याचे सांगितले. संघाने २९ टक्के वाढीचा प्रस्ताव दिला; संघटनांनी तो अमान्य केला. आता याबाबत ४ किंवा ५ जानेवारी रोजी निर्णय होईल असे सांगण्यात आले.