पुणे : अन्य साखर कारखान्यांचा गाळप हंगाम जोमात सुरु असताना शिरूर तालुक्यातील घोडगंगा सहकारी साखर कारखाना बंद आहे. त्याच्या निषेधार्थ भाजप उद्योग आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष संजय पांचगे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी बुधवारपासून धरणे आंदोलन सुरू केले आहे. संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकाची नेमणूक करावी, कारखाना सुरू करावा यासाठी कारखाना कार्यस्थळावर आंदोलन सुरू झाले आहे.
संजय पाचंगे म्हणाले की, गेल्या गळीत हंगामात ३३ लाख रुपये नफा झाला. तरीही यंदा जाणीवपूर्वक घोडगंगा साखर कारखाना बंद पाडण्याचा कट रचला आहे. अध्यक्ष व संचालक मंडळ याला जबाबदार आहे. सरकारने प्रशासक नेमून कारखाना सुरू करावा. याबाबत एक जानेवारी २०२४ पासून बेमुदत उपोषण करणार असल्याची घोषणा त्यांनी केली. भाजपचे माजी तालुकाध्यक्ष रामचंद्र निंबाळकर, ग्राहक पंचायतीचे तालुकाध्यक्ष संपत फराटे, नवनाथ भुजबळ, तात्यासो शेलार, महादेव मचाले, संदीपराव महाडीक, शरद गद्रे आदी उपस्थित होते.