सोलापूर : आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या साखरेची कारखान्यातून परस्पर विक्री झाल्याची शक्यता आहे. या प्रकरणी मागील संचालक मंडळाची कसून चौकशी करावी, अशी मागणी प्रशासकीय मंडळ सदस्य संजय गुटाळ व महेश चिवटे यांनी केली आहे. कारखान्यामध्ये पाच हजार ७२५ क्विंटल साखर शिल्लक होती. ही साखर साखर आयुक्तांमार्फत करमाळा तहसील कार्यालयाने जप्त केली. साखरेचा नायब तहसीलदार विजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली लिलाव झाला.
यावेळी साठ्यामध्ये ५१५ क्विंटल साखर कमी भरली आहे. ही साखर माजी संचालकांनी परस्पर विक्री केल्याचा आरोप करण्यात येत आहे. याबाबत गुटाळ व चिवटे म्हणाले की, आनंद ट्रेडर्सने ही ५७२५ क्विंटल साखर खरेदी केली. पैसे करमाळा तहसीलदारांच्या खात्यावर भरले. प्रत्यक्षात ५१५ क्विंटल साखर कमी असल्याचे निष्पन्न झाले. मागील संचालक मंडळाच्या काळात साखरेची परस्पर बेकायदेशीर विक्री झाली काय ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. याप्रकरणी प्रशासनाने दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान, प्रशासनाने याबाबत खुलासा मागितला आहे.