जळगाव : चोसाका आणि बारामती अॅग्रोमध्ये झालेला भाडे करारनामा हा सर्वसाधारण सभेची मंजुरी न घेता केलेला आहे. कराराची नक्कल कुणालाही वाचायला मिळाली नाही. या करारा विरोधात १३ संचालकांनी राजीनामा दिला. कोणत्याही नेत्याला माहित नसताना करारनामा केला असून तो आम्हाला मान्य नाही. त्यामुळे हा करारनामा रद्द करावा आणि नवीन करारनाम्यासाठी तसेच कर्जावरील १२ टक्के व्याजाबाबत ही नवीन सर्वसाधारण सभा घ्यावी, अशी कठोर भूमिका घेत तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी चोपडा शेतकरी सहकारी साखर कारखान्याची (चोसाका) ३२वी वार्षिक सभा गाजवली.
‘चोसाका’ची २०२१-२२ व २०२२-२३ या वर्षाची ३२वी वार्षिक सर्वसाधारण सभा २७ रोजी दुपारी १ वाजता चहार्डी येथील कारखाना साईट येथे घेण्यात आली. यात अनेक विषय तहकूब करण्यात आले. तर उसाला ३ हजार रुपये प्रति टनाप्रमाणे भाव द्यावा, याबाबत ठराव ही करण्यात आला. या वेळी व्यासपीठावर ‘चोसाका’चे चेअरमन चंद्रहास गुजराथी, माजी आमदार कैलास पाटील, व्हा. चेअरमन एस. बी. पाटील, जिल्हा बँकेचे संचालक घनश्याम अग्रवाल, संचालक डॉ. सुरेश शामराव पाटील आदी उपस्थित होते.
कारखाना चालवण्यासाठी ऊस लावावा लागेल, आजची रिकव्हरी १०वर आहे. करार रद्द करून व्याजावर कारखाना चालणार नाही. कामगारांचा थकीत पेमेंटचा विषय ही लवकरच मार्गी लागेल. १२ टक्के व्याजाचा विषय संचालकांना मान्य नाही. आम्ही बारामती अॅग्रोशी हिशोबच केलेला नाही, तर १२ टक्के व्याजाचा विषय येतो कुठे? व्याज माफीसाठी संचालकांनी प्रस्ताव पाठवला आहे. करार रद्द करणे शक्य नाही, पण प्रोसेडिंगमध्ये सभासदांनी करार नामंजूर केल्याची नोंद घेऊ, असे चेअरमन चंद्रहास गुजराथी यांनी सांगितले.