उसाला तुरे आल्याने शेतकरी धास्तावले, वजनात घट होण्याची भीती

पुणे / कोल्हापूर : शेतकरी अगोदरच दुष्काळसदृश परिस्थितीने हतबल झालेले आहेत. शेतातील उभी पिके पाण्यावाचून करपू लागली असतानाच आता ऊस उत्पादक शेतकऱ्यांपुढे तोडणीअभावी उसाला मोठ्या प्रमाणात तुरे येऊ लागल्यामुळे नवे संकट निर्माण झाले आहे. मागील महिन्यापासून वातावरणात होत असलेल्या बदलांमुळे उसासह सर्वच पिकांवर विपरीत परिणाम होताना दिसत आहे. पुणे, कोल्हापूरसह राज्यातील बहुतांश ऊस उत्पादक जिल्ह्यात उसाला तुरे येऊ लागल्याने शेतकरी धास्तावले आहेत. कारण तुरे आल्याने उसाच्या वजनात घट होण्याची भीती त्यांना सतावत आहे.

लागवडीनंतर उसाची तोडणी साधारण १५ ते १६ महिन्यांनी अपेक्षित असते. पण अनेक साखर कारखानदारांकडून यावर्षी तोडणी दोन ते तीन महिने लांबणीवर गेली आहे. त्यामुळेउसावर तुरे उगवून ते उभ्या उसाला पोकळी तयार होत आहे. परिणामी, उसाचे वजन घटत असून, शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. उसाचे पीक तोडणीयोग्य होऊन बराच काळ गेला असून, तरीदेखील कारखान्यांकडून ऊसतोड मजुरांची शेतकरी वाट पाहत आहेत.

शेतकऱ्यांवर एकीकडे पाणीटंचाईचे संकट, तर दुसरीकडे शेतातील तोडणीला आलेला ऊस कारखाना तोडून नेत नसल्याने शेतकरी दुहेरी संकटात अडकला आहे. उसाचे पीक पाणी टंचाईमुळे करपू लागले असल्याने हातातोंडाशी आलेला घास जातोय की काय, अशी भीती ऊस उत्पादक शेतकरीवर्गाला लागली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here