सोलापूर : मकाई साखर कारखान्याने ३ जानेवारीपर्यंत थकीत ऊस बिल न दिल्यास कारखान्याच्या तत्कालीन चेअरमन व संचालक मंडळावर कारवाई करू, असे आश्वासन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिल्याची माहिती प्रा. रामदास झोळ यांनी दिली. कारखान्याच्या २०२२-२३ मधील थकीत ऊस बिलप्रश्नी शेतकऱ्यांनी प्रा. झोळ यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी दशरथ कांबळे, अॅड. राहुल सावंत, रवींद्र गोडगे, प्रा. राजेश गायकवाड, हरिदास मोरे, शहाजी माने, विठ्ठल शिंदे, माधव नलवडे आदी उपस्थित होते.
गेल्या वर्षभरापासून शेतकरी थकीत ऊस बिलासाठी कारखाना प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहेत. मात्र कोणीच दखल घेतलेली नाही. जर थकीत पैसे मिळाले नाहीत, तर आत्मदहनाचा इशारा शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर दिला. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी तीन रोजी बैठक बोलावली आहे. जर बिले दिली नाहीत तर कारखान्याच्या तत्कालीन चेअरमन, संचालक मंडळासह कार्यकारी संचालकांवर कारवाईचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याचे झोळ यांनी सांगितले.