अहमदनगर : ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी प्रतिकूल परिस्थितीत खोडवा ऊस व्यवस्थापन कसे करावे आणि जमिनीच्या सुपिकतेसाठी व्यवस्थापन कसे करावे, या विषयावर कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या शेतकी व ऊस विकास विभागामार्फत आयोजित परिसंवादात मार्गदर्शन करण्यात आले.वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे ॲग्रो नॉमिस्ट डॉ. अभिनंदन पाटील, सायंटिफिक ऑफिसर डॉ. समाधान सुरवसे यांनी शेतकऱ्यांना खोडवा पिकाचे महत्त्व सांगितले.
नवीन ऊस लागवडीसाठी ऊस बेणे निवडीचे महत्त्व, ऊस तुटल्यानंतर पाचट न जाळता ते जमिनीतच कुजविण्याच्या प्रक्रियेबाबत त्यांनी माहिती दिली.परिसंवादावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष डॉ. मच्छिंद्र बर्डे, गौतम बँकेचे चेअरमन सुधाकर दंडवते, राजेंद्र घुमरे, अनिल कदम, श्रीराम राजेभोसले, शंकरराव चव्हाण, गंगाधर औताडे, गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्ट कंपनीचे कार्यकारी संचालक दौलतराव मोरे, गौतम केनचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर सुभाष गवळी आदी उपस्थित होते. ऊस विकास अधिकारी आण्णासाहेब चिने यांनी प्रास्ताविक केले. माजी संचालक अरुण चंद्रे यांनी सूत्रसंचालन केले. दत्तात्रय शिंदे यांनी आभार मानले.