नवी दिल्ली : देशात गळीत हंगामाने गती घेतली आहे. मात्र, गेल्या हंगामाच्या तुलनेत साखर उत्पादन अद्याप कमीच आहे. नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्ट्रिज लिमिटेडच्या (NFCSF) आकडेवारीनुसार, ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत देशातील ५११ साखर कारखान्यांमध्ये हंगाम २०२३-२४ साठी गाळप सुरू झाले आहे आणि आतापर्यंत १२२२.६४ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. त्यापासून आतापर्यंत ११२.१० लाख टन साखर उत्पादित झाली आहे. गेल्या हंगामात समान कालावधीपर्यंत ५१४ साखर कारखान्यांनी १३२०.५५ लाख टन उसाचे गाळप करून १२१.३५ लाख टन साखर उत्पादित केली होती.
देशभरातील साखरेचा उतारा गेल्या हंगामाइतकाच समान आहे. देशात ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत सरासरी साखरेचा उतारा ९.१७ टक्के आहे. तर गेल्या हंगामात साखर उतारा या कालावधीअखेर ९.१९ टक्के होता. राज्यांतील साखर उत्पादनाकडे पाहिले तर महाराष्ट्र सध्या अग्रस्थानावर आहे. आणि उत्तर प्रदेश त्या पाठोपाठ द्वितीय क्रमांकावर आहे.