संजीवनी साखर कारखाना सुरू करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे साखळी उपोषण

फोंडा : गेल्या दोन महिन्यांहून अधिक काळापासून ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी संजीवनी सहकारी साखर कारखान्यात इनेथॉल प्लांट उभारण्याची मागणी लावून धरली आहे. मात्र, सरकारने या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने मंगळवारपासून गोमंतक ऊस उत्पादक संघटनेच्या सदस्यांनी अखेर आंदोलनाला सुरुवात केली आहे. महाराष्ट्रातील शेतकरी संघटनेनेही या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

गोमंतक ऊस उत्पादक शेतकरी संघाचे अध्यक्ष राजेंद्र देसाई यांनी सांगितले की, कारखाना सुरू व्हावा, इथेनॉल उत्पादन सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत या मागणीसाठी आम्ही गेले काही वर्षे पाठपुरावा करीत आहोत. मात्र, सरकार दुर्लक्ष करीत आहे. मुख्यमंत्र्यांनी आश्वासन देऊनसुद्धा काहीही झालेले नाही. त्यामुळे आता कारखाना परिसरात सदस्यांनी साखळी आंदोलनाची सुरुवात केली आहे. जोपर्यंत सरकार कारखाना सुरु करत नाही, तोपर्यंत गोमंतक ऊस उत्पादक संघटनेचे सर्व सदस्य साखळी उपोषण करणार असल्याचे सांगितले. राजेंद्र देसाई म्हणाले की, सरकारकडे संजीवनी सहकारी साखर कारखाना पूर्ववत सुरू करून गोव्यातील ऊस शेतीला प्राधान्य दिले पाहिजे अशी आमची मागणी आहे. दरम्यान, शेतकरी संघटने नेते रघुनाथदादा पाटील यांनीही भाऊसाहेबांनी दूरदृष्टीने उभारणी केलेला संजीवनी साखर कारखाना पुन्हा सुरू व्हावा यासाठीच्या आंदोलनाला महाराष्ट्रातील शेतकरी पाठबळ देतील, अशी घोषणा यावेळी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here