पुणे : माळेगाव साखर कारखान्याचा गाळप हंगाम जोमात सुरू आहे. मात्र, अशा वेळी ऊस उत्पादक शेतकरी सभासद आपल्या विविध मागण्यांसाठी गुरुवारी (दि. ४) कारखाना कार्यस्थळावर हलगी मोर्चा काढणार असल्याचे कारखान्याचे माजी अध्यक्ष तसेच ज्येष्ठ संचालक रंजन तावरे यांनी सांगितले. तावरे म्हणाले की, कारखाना प्रशासनाने पहिली उचल देण्यासाठी उशीर केला असून, त्यामध्येदेखील फक्त ३ हजार रुपये प्रतिटन पहिली उचल जाहीर करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत.
तथापि, पहिली उचल प्रतिटन ३ हजार २०० रुपये मिळाली पाहिजे, सभासदांच्या उसाला प्राधान्याने ऊसतोडी देऊन सभासदांच्या उसाचे अधिकचे गाळप करावे, उशिरा तुटणाऱ्या उसाला अनुदान द्यावे, अशी मागणी तावरे यांनी केली आहे. दरम्यान, २३ डिसेंबर २०२३ संचालक मंडळाच्या बैठकीतील संपूर्ण प्रोसिडिंग व त्यामधील विषय क्रमांक ६ संदर्भातील पूर्ण माहिती तसेच कामगार संघटनेसोबत झालेल्या कराराची माहिती प्रत तत्काळ मिळावी. बेकायदेशीर ठरावाची अंमलबजावणी तत्काळ थांबवावी, अशी मागणी तावरे यांनी केली आहे. यासंदर्भात सत्ताधारी संचालकांनी मनमानी न करता योग्य तो न्याय द्यावा, यासाठी हलगी मोर्चाचे आयोजन केले असल्याचे तावरे यांनी सांगितले.