पुणे : राज्यातील ऊस तोडणी कामगारांच्या पंकजा मुंडे आणि शरद पवार यांच्या लवादाने पुढील तीन वर्षांसाठी ऊस तोडणीच्या मजुरीत ३४ टक्के वाढ आणि मुकादमाच्या दलालीत (कमिशन) एक टक्के वाढ करण्याचा निर्णय जाहीर केला. साखर आयुक्तालयात ऊसतोडणी मजूर आणि कारखानदारांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूचे अध्यक्ष शरद पवार, ऊसतोडणी मजुरांच्या नेत्या पंकजा मुंडे, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, आमदार जयंत पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार सुरेश धस आदी उपस्थित होते.
कामगारांनी ऊस तोडणीच्या दरात ४० टक्के वाढीची मागणी केली होती. तर कारखानदार २९ टक्के दरवाढीवर आडून बसले होते. त्यात समन्वय साधून ३४ टक्के दरवाढ देण्यात आली, अशी माहिती जयप्रकाश दांडेगावकर यांनी दिली. आता ऊस तोडणी कामगारांची मजुरी प्रती टन २७४ रुपयांवरून ३६७ रुपयांवर जाणार आहे. मुकादमांचे कमीशन १९ टक्केवरून २० टक्के केले आहे. या हंगामापासून तीन वर्षांसाठी हा निर्णय लागू असेल असे सांगण्यात आले.