कोल्हापूर : चंदगड तालुक्यातील तिन्ही साखर कारखान्यांनी चालू हंगामातील ऊस गाळपामध्ये आघाडी घेतल्याचे दिसून येते. यामध्ये चंदगड तालुक्यातील ओलम शुगर्सने आजअखेर सर्वाधिक २ लाख ८६ हजार मे. टन उसाचे गाळप केले आहे. याउलट आजरा व गडहिंग्लज हे दोन्ही कारखाने मागे असल्याचे चित्र आहे. गडहिंग्लज कारखान्याने सर्वांत कमी १४,४२० मे. टन उसाचे गाळप केले आहे. ‘स्वाभिमानी’चे आंदोलन व अवकाळी पावसामुळे यंदाचा गळीत हंगाम लांबला. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच कारखाने उशिरा सुरू झाले. मात्र, आता कारखान्यांनी गाळपावर जोर दिला आहे.
आतापर्यंतच्या गाळपात चंदगड तालुक्यातील तीनही कारखाने आघाडीवर आहेत. हे कारखाने खासगी आहेत. ऊसतोडणी वाहतुकीचे उत्तम नियोजन करत कारखान्यांनी ऊस गाळपावर भर दिला. तर पंचवार्षिक निवडणूक व तोडणी वाहतूक यंत्रणेची कमतरता यामुळे आजरा कारखान्याचे गाळप मंदावले. जुन्या मशिनरीचे आधुनिकीकरण, तांत्रिक अडचणीमुळे गडहिंग्लज कारखान्याच्या गळिताला गती आलेली नाही.